Posts

Showing posts from August, 2021

एकच प्याला

Image
एकच प्याला म्हणून म्हणून लागला बाटली रिजवू तो, मस्तीमध्ये पीता पीता व्यसनी होऊ लागला तो मौजमजा अन् मस्तीचे तरूणाईचे वय ते होते, सळसळ होती रक्तामध्ये भय कशाचेही वाटत नव्हते हळूहळू दारूने त्याला इतका विळखा घातला की, तिच्याविना करमेना त्याला प्रेयसी झाली त्याची ती धुंद होऊनी तिच्यामध्ये तो अखंड डुंबून गेला होता, तिच्याविना जगण्याचा जणूकाही विसरच त्याला पडला होता सरकू लागले आयुष्य पुढे अन् त्याला आता ती पिऊ लागली, रक्तामध्ये भिनूनी त्याला मरणाच्या दारी नेऊ लागली मजेत घेतलेल्या प्याल्याची किंमत मोठी मोजली त्याने, सुंदर असे आयुष्य संपविले दारुच्या त्या व्यसनाने... ✒ K. Satish

प्रगतीचे सूत्र

Image
मुर्खांच्या त्या गराड्यात तो हर्षित झाला स्तुती ऐकूनी, कटू सत्य जो दाविल त्याला दुर्लक्षिले मग शत्रू समजूनी  अधोगतीचे कारण त्याच्या ठरली त्याची हीच ती कृती, स्तुतीपायी मुर्खांच्या झाला राजाचा कंगालपती  बुद्धिमान बोले कटू शब्द असे ते आपल्या कामाचे, मुर्खांची वाहवा मिळवणे लक्षण असे दुर्भाग्याचे  बालिश चमचे स्तुती करूनी स्वार्थ साधती स्वतःचा, विद्वानांच्या द्वेषापोटी कान भरवती ते तुमचा  म्हणूनच माझे एकच सांगणे क्षणिक सुखाची आस नसावी, विद्वानांच्या कटू शब्दांची प्रगतीसाठी साथ असावी ✒ K. Satish

संसाराचे पहिले पान

Image
विस्कटलेले केस मी विंचरूनी घेतले, जेव्हा माझ्या सजनाला मी येताना बघितले  दारी येता बेल वाजली आनंदाने न्हाले मी, सुखद क्षणाच्या जाणिवेने हर्षित होऊन गेले मी  धडधड होतंय काळीज माझं समोर त्यांच्या जाताना, नव्या नव्या या संसाराचे पहिले पान उलटताना  दार उघडता समोर ते अन् त्यांच्यासमोर होते मी, आलिंगन देऊनी तयांना त्यांच्या कवेत गेले मी  नव्या नव्या या संसाराची सुखद अशी ही पहिली पाने, सतत रहावी स्मरणी माझ्या रिक्त न व्हावे प्रेम रकाने ✒ K. Satish

वस्ती माझ्या बालपणीची

Image
माझे जन्मठिकाण होती एक छोटीशी वस्ती, तिथल्या एकजुटीसमोर झुकती मोठ्या मोठ्या हस्ती दोनशे अठ्ठ्याऐंशी कुटुंबांचा संसार तेथे चाले, गुण्यागोविंदाने नांदत होते सगळ्याच धर्मावाले आजच्याइतके पैशाला महत्त्व तेव्हा नव्हते, दुसर्‍याचे दुःख प्रत्येकजण स्वतःचेच समजत होते मोबाईलचे जाळे नव्हते पैशाचा तो अहंकार नव्हता, तरबेज असा कबड्डीपटू प्रत्येक घराघरामध्ये होता आट्यापाट्या, लपंडाव अन् शिरापुरीचा खेळही चाले, बोरीबनातून फळे तोडण्या पार करी मुले नदी अन् नाले भांडण होई सार्वजनिक अन् सगळेच त्याचे साक्षीदार असे, चित्रपटालाही लाजवील अशी दृश्ये नेहमीचं दिसे कामावर जर गेला तरीही नसे काळजी घरच्यांची, दुखले खुपले कोणाचे तर होतसे गर्दी इतरांची भय नव्हते कधी चोरांचे अन् दुःख नसे कमी पैशांचे, राजमहाल तो आमच्यासाठी घर आमचे दोन खोल्यांचे तिथेच झालो शिकूनी मोठे धडे घेतले माणुसकीचे, अजूनही आठवती क्षण तिथले आनंदाचे, एकजुटीचे धकाधकीच्या जीवनात या आठवण येई जुन्या क्षणांची, म्हणूनच आठवी क्षणाक्षणाला वस्ती माझ्या बालपणीची ✒ K. Satish

स्वयंपाकघर

Image
पोटासाठी धडपड नुसती कष्ट करी मानव त्यासाठी, भूक भागण्या अन्न हवे अन् हवे ते सुदृढ शरीरासाठी  स्वयंपाकघर म्हणजे असते राजमहल हो अन्नासाठी, असते येथे हक्काची जागा धान्य, मसाले ठेवण्यासाठी  अन्नपूर्णेचे अस्तित्व येथे विद्यापीठ हे पाककलेचे, स्त्री जगते येथे हर्षाने क्षण निम्मे तिच्या आयुष्याचे  घरात असते हीच ती जागा जल, अग्नि अन् वायुसाठी, येथेच सजते पूजाघरही छोट्या गरीब कुटुंबासाठी  अन्नपूर्णा इथे बनवी हो पाककृती किती निरनिराळ्या, मग खाऊ घाली सर्वांना अन् मिळवी कौतुकाच्या टाळ्या  गरीब असो वा असो धनवान तो प्रत्येकाची भूक भागवती, घरातील एक पवित्र ठिकाण हे स्वयंपाकघर त्याला हो म्हणती ✒ K. Satish